Navratri Utsav: डोंगरदऱ्यात वसलेले देवीस्थान, पिंपोड्याची घुमाईदेवी

Navratri Utsav: डोंगरदऱ्यात वसलेले देवीस्थान, पिंपोड्याची घुमाईदेवी

Navratri Utsav नवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी, कोजागिरी पौर्णिमेला देवीची यात्रा

तेजस लेंभे -प्रतिनिधी पिंपोडे बुद्रुक: Navratri Utsav सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वसना नदीच्या काठावर वसलेल्या पिंपोडे बुद्रुक या गावापासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी डोंगरदऱ्यांच्या कुशीत श्री घुमाईदेवीचे मंदिर आहे. पिंपोडे बुद्रुक या गावापासून उत्तर दिशेला एक रस्ता घुमाईदेवीकडे जातो. पिंपोडेहुन या मंदिराकडे जाताना वाटेत तुम्हाला भावेनगर नावाचे एक छोटेसे गाव लागते. या गावातील भक्तगण घुमाईदेवीला खूप मानतात.

याच गावामध्ये देऊळ या मराठी चित्रपटाचे शूटिंग झाले होते. याच गावातून पुढे २ किलोमीटर गेल्यावर श्री घुमाईदेवी मंदिराची कमान लागते. आसपासच्या परिसरातच पळशीची पिटी आणि केसरी या चित्रपटांचे शूटिंग झाले होते. श्री घुमाईदेवी ही पिंपोडे बुद्रुक या गावची देवी असून आसपासच्या परिसरातील गावांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी नऊ गावांच्या शिवारावर वसली आहे. पिंपोडे बुद्रुक, तडवळे, तांबवे, सालपे, कोपर्डे, लिंबोळी, सोनके, पाडळी, नांदवळ अशा या रम्य परिसरात देवीचा वास असून देवीच्या चारही बाजूला डोंगर आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात घुमाईदेवी डोंगरामध्ये बसलेली आहे. समोरून ओढा वाहत असून बाराही महिने त्यात पाणी असते. हा परिसर हिरवागार झाडांनी बहरलेला असून वन्य पशू आणि पक्षी यांच्या सानिध्यात देवीचे स्थान आहे.
ही देवी येथे कशी प्रकट झाली याची पौराणिक दंतकथा अशी आहे. सालपे गावाजवळच्या घाटातून (रेडे घाट) जाणाऱ्या एका वऱ्हाडाला अडवून राक्षसांनी ठार मारण्याचे ठरवले होते पण त्या वऱ्हाडातील लोकांच्या शिळा झाल्या. दोन सुवासिनी जिवंत राहिल्या. त्या एका घोड्यावर बसून डोंगरातून जात होत्या तेव्हा विजा कडाडल्यासारखा मोठा आवाज झाला. घाबरून घोड्याने कड्यावरून दरीत उडी मारली.घोड्याचे पाऊल ज्या खडकावर पडले तेथे एक खड्डा पडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. काही अंतरावर दोन्ही सुवासिनी वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त झाल्या.

पिंपोडे बुद्रुक या गावातील भैरवजी गुरव नावाच्या पुजाऱ्यांच्या स्वप्नामध्ये हळदी-कुंकवाचा मळवट भरून एक सुवासिनी आली आणि तिने दृष्टांत दिला. आपले या डोंगरातील स्थान सांगून कोकणातून इथे वऱ्हाड्यासोबत मी शिळेमध्ये गुप्त झाली असून या देवस्थानची सेवा कर असे त्याला सांगितले. ती पुढे म्हणाली, उठ घाबरू नकोस. मी देवी आहे, तूच माझी सेवा कर. मी तुझ्या इच्छा पूर्ण करीन. पुजारी दुसऱ्या दिवशी देवीने सांगितलेल्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी एक शिळा होती. त्या शिळेवर माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे चेहरा उमटला होता. त्यानंतर भैरवजीने तेथे जाऊन अनुष्ठान आणि पूजा केली व देवीला आपण कोण आहात असा प्रश्न केला असता तिने दृष्टांत दिला आणि सांगितले, की कड्याकपान्यातून आता जो आवाज घुमतो आहे ती मीच आहे. त्यानंतर त्या गुरवाने श्री घुमाईदेवी या नावाने जयजयकार केला. तेव्हापासून या देवीला घुमाईदेवी नावाने संबोधले जाते. त्या शिळेची म्हणजेच प्रकट झालेल्या घुमाईदेवीची भैरवजी गुरव त्यानंतर नित्यनेमाने पूजा करू लागला.ही देवी माहेरवाशिणीच्या संकटाच्या वेळी धावून येते याची नेहमीच प्रचिती येते. ही देवी नवसाला पावते असा या परिसरातील लोकांचा विश्वास निर्माण झाला.

जैतोजी आणि फिरंगोजी लेंभे हे दोन भाऊ पिंपोडे बुद्रुक गावात राहात होते. फिरंगोजीना पुत्रसंतान नव्हते. त्यांनी आपली व्यथा पुजारी भैरूजींना सांगितली. घुमाईदेवीची नवसाची काठी व मानाची पालखी आणण्याचा सल्ला भैरूजींनी दिला. फिरंगोजी लेंभे हे देवीला पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलले त्याप्रमाणे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याप्रमाणे फिरंगोजी पूजा करू लागले. त्यांच्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली, माझ्यामागून वऱ्हाडातील शिपाई मांगोबा आला आहे. त्याला तूच जागा दाखव आणि जागर, गौंधळ सुरू कर. भैरूजी व फिरंगोजी लगोलग कार्यक्रम आटोपून ते तेथेच झोपले. फिरंगोजींच्या स्वप्नात घुमाईदेवी येवून म्हणाली, उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे. पिंपोडे गावातून माझा भाऊ भैरवनाथ याला पालखीत बसवून तुझ्या खांद्यावर घेवून माझ्या भेटीला घेवून ये, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

देवीच्या आदेशानुसार फिरंगोजी कोजागिरी पौर्णिमेला भैरवनाथाची मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत घेऊन देवीच्या भेटीसाठी डोंगरात गेले व तेथे लहानशी यात्रा भरवली. तीच प्रथा अजूनही सुरू आहे. तेव्हापासून पालखी आणि काठी वाजतगाजत, घेवून जाण्याचा मान वंशपरंपरेने फिरंगोजीच्या वारसांकडे सुरू आहे. साळुंखे कुटुंबालासुद्धा घुमाईदेवी नवसाला पावली. अशा रीतीने दोन्ही कुटुंबात आनंद झाला म्हणून फिरंगोजी लेंभे यांना पालखीचा मान व जागरणाचा मान साळुंखे कुटुंबाला आहे.

यात्रेच्या दिवशी भाविक मंडळी वनभोजन करतात.दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला या देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे, की ही यात्रा पुरणपोळीची असते. दोन दिवसांची ही यात्रा खूप मोठी असते. यात्रेच्या आदल्या दिवशी भावेनगर या गावातील ग्रामस्थ घुमाईदेवीचा छबीना आणि मिरवणूक काढतात. ढोल-ताशांच्या आवाजाच्या गजराने येथील डोंगर दऱ्यांचा परिसर घुमून जातो. नवरात्री काळात परिसरातील महिला या देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने येतात. पिंपोडे बुद्रुक, भावेनगर ग्रामपंचायत आणि घुमाईदेवी मित्रमंडळाच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. घाट, वृक्षारोपण करून हा परिसर निसर्गरम्य केला आहे. मंदिराच्या शिखराचे आणि सभा मंडपाचे उत्तम काम केले आहे. भाविकांना पूर्वी पायवाटेने येताना अडचणीतून जावे लागत होते. आता पायऱ्या आहेत. आकर्षक दोन कमानी आहेत. मंदिराच्या परिसरातील उंचवट्याचा भाग सपाट करून तेथे झाडे लावली आहेत. लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबर राज्याबाहेरून भाविक येतात. मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)