सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी

आमदार शशिकांत शिंदे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाशी केली चर्चा
त्याग, संस्कार आणि दूरदृष्टीने स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडू शकला. सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था योग्य नाही. याबाबतीत तातडीने पावले उचलून स्मारकाला झळाळी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतीय पुरातत्त्व विभागाने थेट मुंबईतून यंत्रणा गतिमान करत नगरपालिकेच्यावतीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा या नात्याने माँ जिजाऊ साहेबांच्या स्मारकासाठी योगदान देता आले याचा आनंद असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील जालना आणि बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सिंदखेडराजा येथील पवित्र भूमीवर राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळी भेट दिली. यावेळी राजमातांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ॲड. रोहिणीताई खडसे, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर,
तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, नगरसेवक श्यामभाऊ मैत्री, विजूभाऊ तायडे, नरूभाऊ तायडे, बबन मस्के, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालाजी कळकुंबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई जाधव, सिताराम चौधरी, जगन्नाथ सहाने, सतीशभाऊ काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्मारकाच्या अवस्थेबाबत सांगितल्यानंतर माँ साहेबांच्या स्मारकाची पाहणी करून तातडीने याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी तेजस गर्ग यांना थेट मोबाईलवरून कॉल करून स्मारकाबाबतची माहिती दिली. पुरातत्व विभागाला मर्यादा असल्याने आणि स्थानिक नगरपालिका क्षेत्र असल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून या स्मारकाची देखभाल दुरुस्ती केली जावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. नगरपालिका या विषयात सकारात्मक असल्याचेही निदर्शनास आणून दिल्यानंतर गर्ग यांनी आपल्या विभागातून सर्व माहिती घेतल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे पुन्हा संपर्क साधून स्मारकाच्या दुरावस्थेबाबत वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट केले, मात्र वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून सिंदखेडराजा नगरपालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावा, याबाबत प्रस्ताव तपासून घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
छत्रपती शिवरायांचा मावळा या नात्याने आमदार शशिकांत शिंदे यांनी माँ साहेबांच्या स्मारकाविषयी लक्ष घातल्याने केवळ अर्ध्या तासात हा विषय मार्गी लागू शकला आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा अद्वितीय व्यक्तिमत्व घडवणाऱ्या या प्रेरणामूर्ती मातोश्रींना नतमस्तक होऊन वंदन करण्याचे भाग्य लाभले.
आजही त्यांचे विचार व कर्तृत्व प्रत्येक पिढीला नवा आत्मविश्वास, प्रेरणा आणि दिशा देतात. त्यांच्या स्मारकाचे संगोपन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो आणि त्याप्रमाणे यापुढे आम्ही कार्यरत राहू, असा शब्द त्यांनी दिला.
पक्षाच्यावतीने लवकरच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना निवेदन सादर केले जाणार आहे. त्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी चर्चा देखील केली जाणार आहे. त्याचबरोबर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला तातडीने या विषयात लक्ष घालण्यास सांगितले जाईल. कोणत्याही परिस्थितीत हे स्मारक चांगले राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.





