किल्ले रायगडावर मंगळवारी शौर्य दिन कार्यक्रम

सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांना करणारा अभिवादन
कोरेगाव : स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली, या लढाईत कोरेगावचे समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. दि. १८ मार्च २०२५ रोजी या घटनेला गौरवशाली २५२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कोरेगाव येथील श्रीमान हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने किल्ले रायगड येथे शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कोरेगावातील बर्गे कुटुंबातील सदस्य व १८ पगड जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत. श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग सुतार आणि ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी याबाबतची माहिती दिली.
स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली. या लढाईत कोरेगावचे सरदार समशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तेव्हा रायगडावरील सिहांसनासमोर येवून सरदारांनी रुप्याची फुले उधळली त्यांच्या साथीदारासमवेत सिहांसनास मुजरा करुन नतमस्तक झाले. या घटनेस गौरवशाली २५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरेगावकरांसाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. किल्ले रायगड येथे बर्गे कुटुंबातील सदस्य आणि कोरेगाव शहरातील अठरापगड जातीचे लोक मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर राजसिंहासनासमोर भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. त्याचबरोबर समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जाणार आहे.
सरदार राजश्री खंडेराव तुळाजी बर्गे हे सातारच्या गादीचे सच्चे आणि प्रामाणिक सेवक होते. छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांच्या चार पिढ्या खर्ची पडल्या. आपले प्राणपणाला लावून स्वराज्य रक्षणाचे कार्य त्यांनी सुरु ठेवले.
सरनौबत राजश्री तुळाजी लिंबाजी बर्गे हे इ.स. १७०८ पासून स्वराज्य सेवेत थोरले शाहू महाराज यांच्याकडे कार्यरत होते. त्यांचे जेष्ठ पुत्र खंडेराव बर्गे हे त्यांच्याबरोबर लहानपनापासून मोहिमेवर जात असत. युध्दभूमीच्या लढायाचे बाळकडू वडिलांपासूनच त्यांनी मिळविले.
इ.स. १७५१ मध्ये विठ्ठल शिवदेव यांच्याबरोबर राजश्री खंडेराव बर्गे स्वतःचे २०० स्वारानीशी गुजरात स्वारीत सामील झाले. ती मोहीम फत्ते करुन त्यांनी स्वराजाची सेवा केली. इ.स. १७५२ मध्ये गंगथडी प्रांतात नाशिकच्या गढीला वेढा घालून ती गढी हस्तगत केली. मोगलांना नामोहरम केले, तेव्हापासून ती गढी स्वराज्यात कायम राहिली. इ.स. १७५५ ते ५६ मध्ये खारेपाटणच्या लढाईत समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी सक्रीय भाग घेतला, तेथे विजयश्री मिळवली. आंग्रेना शह बसविला. त्यांचा सेनापती रुद्राजी धुळप व इतर दोन सरदारांना कैद केले. खंडेराव बर्गे यांचे धाकटे बंधू सरदार आनंदराव बर्गे यांनी या कैद्यांना किल्ले पुरंदरला पोहोचवले. बर्गे सरदारांच्या बरोबर त्यांच्या गावातील अठरापगड माणसे मदतनीस म्हणून हजर असत. त्यांचे वंशज आजही कोरेगाव येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत. कोरेगावातील बर्गे कुटुंबीयांनी त्यांचा कायमच सन्मान ठेवला आहे.

किल्ले रायगड येथे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे अध्यक्षतेखाली हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर राजसिंहासनासमोर समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांना अभिवादन केले जाणार आहे. या सोहळ्यामध्ये पुणे येथील प्रख्यात इतिहास अभ्यासक सचिन कमलाकर करडे यांचे “सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे व बर्गे घराण्याचे स्वराज्यातील योगदान” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमानंतर सोहळ्यास उपस्थित महिला, पुरुष किल्ले रायगडचे दर्शन घेतील अशी माहिती श्री. सुतार व ॲड. बर्गे यांनी दिली.
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये भली मोठी पितळी घंटा अर्पण; बर्गे कुटुंबियांसाठी मानाची गोष्ट
कोरेगाव येथील वीर आणि तेजस्वी बर्गे घराणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुने विश्वासू सरदार होते. जवळपास सर्व लढायांमध्ये सरदार समशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बऱ्याच जमिनी इनाम म्हणून बर्गे घराण्याला दिल्या आहेत. सरदार समशेरबहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव बर्गे यांच्यावर सोपवली होती. त्याबद्दल साताराचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी समशेर बहाद्दर हा किताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले. मोहीम फत्ते झाल्यानंतर खंडेराव बर्गे यांनी आपल्या घराण्याचे कुलदैवत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये भली मोठी पितळी घंटा अर्पण केली. आजही ही पितळी घंटा श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये प्रवेश करताना पहावयास मिळते. त्यावर दुर्मिळ “सरदार खंडेराव बर्गे” अशी कोरलेली अक्षरे दिसत आहेत. कोरेगावातील बर्गे कुटुंबासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे.






